साहित्य:
१ वाटी तांदूळ, १ वाटी पिठीसाखर , तळण्यासाठी तेल किंवा तूप , खसखस , केळी किंवा दही
कृती:
सर्वप्रथम १ वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने दोनदा धुऊन घ्यावेत व ३ दिवस पाण्यात भिजवून ठेवावेत. ३ दिवस रोज पाणी बदलावे व चौथ्या दिवशी ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन एका चाळणीत निथळण्यास ठेवावेत. त्यातील पाणी निघून गेले की ते तांदूळ एका स्वच्छ सुती कपड्यावर पसरून ठेवावेत. थोडेसे अर्धवट ओलसर असतानाच ते मिक्सर मधून काढून घ्यावे व ते पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे. नंतर त्या पिठात १ वाटी पिठीसाखर टाकावी व ते मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे. ते मिश्रण हवाबंद डब्यात ठेवावे आणि २ ते ३ दिवस मुरू द्यावे.
अनारसे करायचे असतील तेव्हा ते पीठ हाताने मोकळे करून त्यात हळूहळू कुस्करलेले केळ लागेल तसे टाकून ते पीठ भिजवून घ्यावे. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून खसखशीवर थापावेत. गरम तेलामध्ये खसखस लावलेली बाजू वरच्या बाजूला ठेवून एक एक अनारसा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावा. (तळताना अनारसा पलटू नये).
टिप :
अनारसा तळताना तेल किंवा तूपाचे प्रमाण जास्त लागते.
अनारसा तळताना कढईतील तेल किंवा तूप झाऱ्याने अनारश्यावर टाकावे म्हणजे अनारश्याला छान जाळी पडते.
Comentários