आज,दिनांक २९/१२/२०२०२ रोजी मंगळवारी मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला श्री त्रिमुर्तीचे
अवतार भगवान श्री दत्तात्रेय यांची जंयती आहेत....
श्रीगुरू या शब्दाच्या प्रारंभ ज्यांच्या पासुन होतो
त्यांची म्हणजे श्री दत्तात्रेय जंयती आहेत व आज आपण श्रीगुरू चे जन्माचे चरित्र वाचुन आपल्या जीवनचे सार्थक करून घेऊया...
श्रीगुरूदत्तात्रेय प्रार्थना
ब्रम्हानंदं परम् सुखदं केवलं ज्ञानमूर्तीम्।
द्वंद्वातीतम् गगन सद्दशं तत्वमस्यादि लक्षम्॥
एकम् नित्यम् विमल मचलम् सर्वधी साक्षी भूतम।
भावातीतम त्रिगुण रहितम् सदगुरुम् तं नमामी॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:।
गुर्रुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:॥
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सदगुरु।
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सदगुरु।।
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो
मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर । तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं॥
वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण । ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥
अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.
श्री दत्तात्रेय याचे जन्मस्थानः-
श्री अत्रिऋषी चा आश्रम रूक्ष नावाचा पर्वत (आताचा सातपुडा नावाचा पर्वत) व विध्या नावाची नदीच्या(आताची विदर्भातील वर्धा नावाची नदी) काठावर आश्रम आहेत आणि श्रीक्षेत्र माहूर जवळ ता. कळंम जवळ श्रीक्षेत्र निरंजन माहूर हे स्थान आहे. इथे श्री अत्रिऋषी चा आश्रम पण आहेत व देवी अनुसूया चे मंदिर आहेत व श्री दत्तात्रेयांचा पदुका ही आहेत.
दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला व रोहिणी या नक्षत्रावर जन्म झाला आहे.
त्रैमुर्ति श्रीदत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते सविस्तर माहिती
श्रीगुरू चरित्र आ.४ नुसार
" असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम, मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो."
सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते.त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रम्हा.त्यालाच ब्रम्हांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रम्हाने तेथे चौदा भुवने निर्माण केली. दहा दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसूया. हे श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्यरूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल कि काय अशी सर्व देवांना भिती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री-अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, "महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे.ती काया-वाचा-मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड, शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते.ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल." देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रम्हा-विष्णू-महेश भयंकर रागावले आणि म्हणाले,"चला, आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू. नाहीतर यमलोकाला पाठवू." असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रम्हा-विष्णू-महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला. मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया आश्रमात एकटीच होती. ते अनुसुयेला हाक मारून म्हणाले, "माई, आम्ही ब्राम्हण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते. अतिथी-अभ्यांगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो."
तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले. बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली,"आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढते." तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे." "ठीक आहे." असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे . तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ. नाहीतर आम्ही परत जातो.
त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती.तिनी ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील ?
आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होइल.विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारुण नेइल." असा विचार करून अनुसूया त्या भिक्षुंना 'तथास्तु' असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले.पतीची मनात पूजा केली.मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा बिक्शुन्काच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य ! त्याचक्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली.मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकूळ होउन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यानं सगळी हकीकत सांगितली. हि तीन बाळे म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिमुर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रम्हा-विष्णू-महेश अत्रॆन्पुधे प्रकट झाले 'वर माग' असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसुयेला म्हणाले, "त्रिमुर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे." तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, "नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या." अत्री म्हणाले, "हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर पुत्ररूपाने येथेच राहा." तेव्हा 'तथास्तु' म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले.
मग ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील.तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरम्परेचे मुळं पीठ आहे. अशाप्रकारे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला दत्त्जान्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, "श्रीगुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा" सिद्ध्योग्यांनी तथास्तु म्हटले.
आता श्रीदत्तात्रेय या पासून पुढे तिन अवतार झाले प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्रीगुरू दत्तात्रेय याचे आहेत अजून श्री गजानन महाराज शेगांव व श्री साईबाबा शिडी हे पण अवतार आहेत.
श्री दत्तात्रेय अजून माहिती
दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान आहे औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.
दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.
दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.
दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त'
श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात.
`दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.
दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे – झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.
श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू - यदुअवधूत संवाद
भगवान श्रीकृष्ण ह्यांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला व त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली. तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्रीदत्तात्रेयाने मी २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले. त्या त्या गुरूचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितले.
सदर उपदेशाचा श्रीमद्भागवत पुराणात अकराव्या स्कंधात अध्याय सात ते नऊमध्ये उल्लेख आलेला आहे. प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्तमहात्म्यातही याचा उल्लेख आढळतो. ‘जो जो म्या जयाचा घेतला गुण तो तो म्या तया गुरू केला जाण’ याप्रमाणे व्यक्ती, वस्तु, पंचमहाभुते, प्राणी, पक्षी यासर्वांकडून श्रीदत्तगुरूंनी गुण ग्रहण करून त्यांना गुरू केले. सर्वच गोष्टी भक्तांना अभ्यास करण्याजोग्या आहेत.
१) पृथ्वी
पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणिमात्रांचे आश्रय स्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते. खोदणे, नांगरणे, कचरा, घाण यांसारखे आघात साहून सर्व प्राणिमात्र व वृक्षसंपत्ती यांचे पोषण करते.
पृथ्वीचेच अंग वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. मुळापासून शेंड्यापर्यंत फळे, फुले देऊन सर्वांना सुखी करतात. ते वाळून गेल्यावरही त्याचा उपयोग होतो. परोपकाराय तिष्ठंति वृक्षा: । परोपकाराय इदं शरीरम् । त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा.
पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच करतात. त्याचप्रमाणे साधु-संन्यासी यांना आश्रय देतात. याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्यांचा परोपकारासाठी उपयोग करावा.
२) वायू
वायू दोन प्रकारचे. शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते. म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा. दुसरा वायू बाहेरचा. हा कुठेही आसक्त होत नाही. सुगंध दुर्गंध (पृथ्वीचा गुण) दूर करून पवित्र होऊन राहतो, म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे.
३) आकाश
आकाश सर्वत्र आहे. याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. त्याचप्रमाणे आत्माही सर्वव्यापक आहे. शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते.
४) जल (उदक)
जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावत: स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे, कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. जलाप्रमणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते.
५) अग्नी
अग्नीला आकार नाही. जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो. पूर्णपणे वस्तू जळल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही. तेजस्वीपणा त्याचा प्रख्यात आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण असेपर्यंत ह्या देहाचा सदुपयोग करून घ्यावा, अर्थात मोक्षप्राप्ती करता.
६) चंद्र
चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र जसाचा तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीरावस्था असते. आत्मा हा जसाचा तसाच असतो.
७) सूर्य
सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे. पण त्यात आसक्त होऊ नये.
८) कपोत पक्षी (कबुतर)
कपोत पक्षी व कपोतीण एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली. पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले. तसेच मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्यवेळी संसाराचा मोहत्याग करावा.
९) अजगर
आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल, कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे.
१०) समुद्र
समुद्रात सर्व नद्या पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लीत होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे.
११) पतंग
दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये. संयम राखावा.
१२) भृंग
निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान - मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे.
१३) मातंग
मातंग म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून त्याला आकर्षित करतात व तो खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात. यापासून स्त्रियांच्या मोहात पडू नये हे शिक्षण मिळते.
१४) मधुमाशी
मधुमाश्या फुलांवर जाऊन मध गोळा करतात व ते पोळ्यात जमा करतात. परंतु त्या पोळ्याला आग लावून मनुष्य ते पोळे मधासाठी हस्तगत करतो. म्हणून धनाचा संग्रह करणाऱ्या लोकांची अशीच गत होते. दरोडे - डाके पडून प्राणहानीही होते. म्हणून धनाचा संग्रह वर्ज्य करावा.
१५) मृग
हरिण हे चपळपणासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी पारधी लोक बासरीसारखे वाद्य वाजवून त्याला स्थिर करतात व नंतर त्यावर जाळे टाकून त्याला पकडतात. म्हणून ग्रामगीते म्हणजे श्रृंगारिक लावण्या वगैरे श्रवण करू नये. भगवंताच्या गुणगानाचेच श्रवण करावे.
१६) मत्स्य
मत्स्य पकडण्यासाठी पद्धती म्हणजे एका दोरीला गळ लावतात. त्याला खाद्य म्हणून मासांचा तुकडा लावतात. दोरी काठीला बांधून ती पाण्यात सोडतात. माशाने ते तोंडाने धरताच त्याच्या टाळूला गळ अडकून पडतो व तो प्राणास मुकतो. म्हणून भोज्य पदार्थांच्या आवडीवर रसना (जीभ) ताब्यात ठेवावी.
१७) पिंगला
विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची सुंदर देखणी वेश्या राहत होती. धनाच्या लोभामुळे तिच्याकडील पुरुषांचे येणे पुढे बंद झाले. एके दिवशी घरात- बाहेर येणे- जाणे सुरू होते. तरी कुणीही पुरूष तिच्याकडे आला नाही. तेव्हा तिला एकदम आपल्या व्यवसायावर उपरती / वैराग्य प्राप्त झाले व पुढे ती आत्मानंदात राहू लागली. निव्वळ आशेवर जगू नये. त्यामुळे दु:ख प्राप्त होते. परंतु वैराग्य आल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही.
१८) कुरर पक्षी
याला टिटवी म्हणतात. हे मांसपक्षी पक्षी आहेत. असाच एकदा मासाचा गोळा प्राप्त झाल्यावर तो सर्व पक्ष्यांनी सारखा वाटून घेतला. काही पक्ष्यांनी लवकर खाऊन संपविला पण एक पक्षी हळूहळू खात होता. त्याच्याजवळ बरेच मांस उरले म्हणून बाकीचे पक्षी त्या पक्ष्यावर मांस खाण्यासाठी तुटून पडले. जेव्हा त्या पक्ष्याने मांसाचा तुकडा फेकून दिला त्यानंतर त्याला कोणीही त्रास दिला नाही. तात्पर्य असे की परिग्रह (संग्रह) हा दु:खाला कारणीभूत होतो म्हणून धनादिकाचा संग्रह करू नये.
१९) बालक
लहान बालक कोणतीही चिंता न करता आपल्या आनंदात मग्न असते. मान-अपमान, पाप-पुण्य इ. चिंता त्याला असतात. ते आपल्या आनंदात क्रीडा करीत राहते. ती त्याची अंतर्वृत्ती आहे. याप्रमाणे मनुष्याला अंतर्वृत्तीने सुख मिळते हे शिक्षण बालकाला गुरू करून मला मिळाले.
२०) कुमारी कंकण
एका उपवर मुलीला पाहण्याकरता काही पाहुणे तिच्या घरी आले. त्यावेळी घरचे सर्व लोक बाहेर गेले होते व तिला गायीसाठी म्हणून घरीच ठेवले होते. ऐनवेळी त्यांच्या जेवणाची सोय करावी म्हणून तिने साळी कुटण्यास घेतली. परंतु तिच्या कंकणांचा आवाज होऊ लागला. त्या आवाजाचे मात्या-पित्यांना दूषण येईल म्हणून एक-एक कंकण काढत गेली. जेव्हा एकच कंकण राहिले तेव्हा आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांतच असावा हे शिक्षण मला मिळाले.
२१) सर्प
सर्प हा समूहाने राहत नाही. ते एकटेच फिरतात. त्यांना दुखावल्याशिवाय कोणाला डंख करीत नाही. त्याप्रमाणे संन्याशाने सतत फिरत राहावे. पण मठ, आश्रम बांधू नये.
२२) शरकार
शरकार म्हणजे बाण बनविणारा लोहार. हा बाण बनविण्याच्या वेळी कोणत्याही दुसऱ्या आवाजाकडे लक्ष देत नाही. जवळून राजाची मिरवणूक गेली तरी त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या कामात एकाग्रता ठेवावी. जप, तप, योग साधन इ. करणाऱ्यांना अशी एकाग्रता आवश्यक आहे. हे शिक्षण मला शरकाराकडून मिळाले.
२३) कुंभारीण माशी
ही माशी पावसाळ्यात एका अळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते. त्या अळीला प्रत्येक वेळी जाता - येता तिच्याजवळ असलेल्या काट्याचा डंख करणाऱ्या माशीतच असते. पुढे समयानुसार त्या अळीला डंख करीत असलेल्या जागी नवा काटा निघतो व ती अळी कुंभारीण माशी बनते. तात्पर्य ज्याचे आपण नित्य ध्यान करू त्यातच आपले रूपांतर होईल (हा किटकन्याय म्हणून ब्रह्मचिंतनात प्रसिद्ध आहे)
२४) कोळी
हा आपल्या नाभीतून सूत्र काढून त्याचे जाळे बनवितो. त्यात तो यथेच्छ क्रीडा करून ते जाळे स्वत:मध्ये सामावून घेतो. त्याप्रमाणेच ईश्वरही हे जग निर्माण करतो व यथाकाळ राहून आपल्यामधे सामावून घेतो. त्याला बाहेरची आणखी सामग्री लागत नाही. नरदेह प्राप्त झाल्यावर या जन्मात जे लोक मोक्ष साधन करून घेत नाही त्यांचा पुनर्जन्म होत राहतो.
अशाप्रकारे यदूला श्रीदत्तात्रेयांनी ज्ञान सांगून कृतार्थ केले, तेच ज्ञान मी तुला सांगितले, असे श्रीभगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात.
श्रीदत्तात्रेयांची स्थानांची माहितीत
श्री क्षेत्र माहुर ( जि. नांदेड ), महाराष्ट्र.
श्री क्षेत्र गिरनार ( जि. जुनागड ), सौराष्ट्र, गुजरात.
श्री क्षेत्र पिठापूर ( जि. पूर्व गोदावरी ), आंध्रप्रदेश. (संकेतस्थळ )
श्री क्षेत्र कुरवपूर ( जि. रायचूर ), कर्नाटक.
श्री क्षेत्र कारंजा दत्त ( जि. वाशिम ), महाराष्ट्र. (संकेतस्थळ )
श्री क्षेत्र नृसिहंवाडी ( जि. कोल्हापूर ), महाराष्ट्र.
श्री क्षेत्र औदुंबर ( जि. सांगली ), महाराष्ट्र.
श्री क्षेत्र गाणगापूर ( जि. गुलबर्गा ), कर्नाटक.
श्री क्षेत्र माणिक नगर ( जि. बिदर ), कर्नाटक. (संकेतस्थळ )
श्री क्षेत्र अक्कलकोट ( जि. सोलापूर ), महाराष्ट्र.
श्री क्षेत्र माणगांव ( जि. सिंधुदुर्ग ), महाराष्ट्र. (संकेतस्थळ )
श्री क्षेत्र गरुडेश्र्वर ( जि. नर्मदा ), गुजरात. (संकेतस्थळ )
श्री दत्ताची आरती एक चैतन्य आविष्कार
दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन'च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल.
दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
- संत एकनाथ
आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ
आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.
१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.
२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.
३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.
४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार?
५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.
६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.
७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्यातून माझी सुटका केली. मला मोक्ष (टीप) दिला, असा आहे.
८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.
‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे
दत्ताउपासना व पादुका
पादुकांना नमस्कार कसा करावा?
पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असणे अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके नठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.
'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून पादुकांच्या खूंट्या आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो,त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे.
श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.
अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा तीशक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजाकेली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत. विष्णूचाजसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच
'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥'
असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.
श्री गुरुदेव दत्त
नमो सदा श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेय महाराज
Comments