top of page
  • श्री विनोद पंचभाई

गुरु महात्म्य​

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥ गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्। गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥ सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलम्। गुरोरडिध्रपयोबिन्दुसहस्त्रांशेन दुर्लभम्।। हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन। तस्मात् सर्व प्रयन्तेन श्रीगुरूं शरणं व्रजेत्॥ गुरूरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकम्। गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरूम्॥





आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.


व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.


दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.


खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !


गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो,

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥


आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. गुरु दोन प्रकारचे असतात एक गुरु ! एक सदगुरु ! अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की,

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण ।


गुरुसी पडले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥” असे सांगून अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.


ज्यांनी आत्मनात्मविवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचविले तो सदगुरु अखंड माझ्या ह्र्दयात आहे, म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे. आदर आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते. (दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागणे.) ज्याप्रमाणे हाती चिंतामणी लागल्यास मनुष्याचे सदासर्वदा मनोरथ पूर्ण होतात.


‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.


आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.


भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.


गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.


गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे.


आपल्या जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ (आषाढ पौर्णिमा) हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिध्द गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहेत.


‘गुरुबिन कौन बतायें ‘बाँट ।’ हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सदगुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सदगुरुंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वत:हूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्धकर्मानुसार आपल्याला सदगुरु भेटतात. सदगुरुंकडून एकदा का अनुग्रह घेतला की, त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. जशी प्रतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते; त्याप्रमाणे सदगुरुंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे-पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सदगुरुच सर्व काही करवून घेत असल्यामुळे नामधारकाच्या ‘मी’ ला कुठेही वाव नसतो. सदगुरुंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु, एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते.


सदगुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे,

१) सदगुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे.

२) त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे.

३) कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये.

४) नामावर, सदगुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.


भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.


सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान.


गुरु कोणाला करावे ? जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच,

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे । मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥


गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. (उदा. पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे.)


आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्श देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तिर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सदगुरुंचा महिमा अपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सदगुरु म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांतीसुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्तिज्ञानाची पेठ, शुध्दभाव इ. गोष्टी त्यांचे ठायी असतात.


जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सदगुरु साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सदगुरु आपल्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.


साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.


गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्र्ह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.


कैलास पर्वतावर भगवान शंकर व भवानी पार्वतीमाता पारमार्थिक गप्पा करत बसले असता, पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना सर्वजणांच्या उद्धाराविषयी प्रश्न विचारला, ‘कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जणांचा उद्धार होईल?’ त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गुरुगीतेची महती सांगितली.


श्री गुरुंचे सतत स्मरण, गुरुंनी दिलेल्या नामाचा सदासर्वकाळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे. काया-वाचा मने, श्वेने-वित्ते-प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक आहे. एखादे वेळेस श्री भगवान शंकर क्रोधीत झाले तर गुरु सांभाळून घेतात. परंतु गुरु क्रोधीत झाले तर शंकर सांभाळून घेत नाही. तेव्हा श्री गुरुंना शरण जाणे महत्त्वाचे. श्रीगुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा ह्या तिन्हीची वस्ती त्यांचे ठायी असते. भुक्ति-मुक्ति देणारे, त्रिकालध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचेच स्मरण, पुजेस श्रीगुरु चरण, मंत्र-त्यांनी दिलेले नाम. एवढे झाल्यास श्रीगुरुंची कृपा होऊन साधक मोक्षाप्र्त जातात. तेव्हा श्रीगुरुंचेच भजन, चिंतन, स्मरण, नमन करावे.


गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक !

१. साधकाने श्रीश्री यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.

२. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.

३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.

४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणार्या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.

५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.

६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.

७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.

८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.

९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.

१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.

११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.

१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.

१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.

१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.

१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.

१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल, तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.

१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.

१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.

२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.

२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.

२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.

२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.

२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.

२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.

२६. गुरुमंत्राचा जप करणार्याचीच आध्यात्मिक उन्नती होते.

२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.

२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु !

२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.

३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.

३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.


एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात.

1,068 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comentários


bottom of page