गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुपौर्णिमा खुलासा
दिनांक २३ जुलै रोजी दाते पंचांगामध्ये गुरुपौर्णिमा व व्यासपूजा दिलेली आहे. मात्र उत्तरेतील काही पंचांगांमधून गुरुपौर्णिमा दिनांक २४ जुलै रोजी दिलेली आहे आणि २३ जुलै रोजीच गुरुपौर्णिमा करावी अशा आशयाचे अनेक मेसेज देखील Social Media च्या माध्यमातून पसरविले जात आहेत. त्यामुळे खरोखर गुरुपौर्णिमा कधी करावी असा प्रश्न सश्रद्ध व्यक्तींच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे.
धर्मसिंधु मध्ये स्पष्टपणे पौर्णिमा सूर्योदयापासून ३ मुहूर्तापेक्षा अधिक असेल तर पौर्णिमेस व्यासपूजन करावे असे दिलेले आहे, याचाच अर्थ पौर्णिमा सूर्योदयपासून ३ मुहूर्त म्हणजेच ६ घटी पेक्षा कमी असेल तेंव्हा चतुर्दशी चे दिवशी व्यासपूजन, गुरुपौर्णिमा करावी म्हणून आमचे पंचांगात शास्त्रवचनानुसार दिनांक २३ रोजी शुक्रवारी गुरुपौर्णिमा दिलेली आहे, यापूर्वी देखील पौर्णिमा ६ घटी पेक्षा कमी असताना चतुर्दशीचे दिवशी गुरुपौर्णिमा दिलेली होती.
महाराष्ट्र व गुजरातसह भारतामधील अनेक पंचांगात, तसेच सर्व कलेंडर्स मध्ये सुद्धा दिनांक २३ रोजी शुक्रवारी गुरुपौर्णिमा दिलेली आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत त्यामध्ये दिलेल्या दिवशी करणे योग्य होईल. म्हणून दिनांक २३ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करावी.
उत्तर भारतातील ज्या प्रदेशात सूर्योदय लवकर होत आहे तेथे पौर्णिमा समाप्ती सूर्योदयानंतर ६ घटी नंतर होत असल्याने त्या प्रदेशात 24 रोजी दिलेली गुरुपौर्णिमा योग्य आहे.
मात्र महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या प्रदेशातील एकाही गांवी सूर्योदयानंतर ६ घटी पौर्णिमा नसल्याने या प्रदेशात 24 रोजी गुरुपौर्णिमा करणे चुकीचे ठरेल.
गुरुपौर्णिमा माहिती
आषाढ पूर्णिमेस गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा संन्यासीलोक त्या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. भारतामध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते श्रेष्ठ मानले जाते. भारतामध्ये गुरुशिष्य नात्याची मोठी परंपरा आहे. ज्या गुरूंमुळे आपण घडलो त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात. व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. गुरु परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानलेले आहे. सर्व ज्ञानांचा उगम व्यासापासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे.
या दिवशी स्नानादी नित्यकर्मे आटोपून 'गुरुपरंपरा सिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये' असा संकल्प करून गुरूंची षोडशोपचार पूजा करतात.
दाते पंचांग
Comentarios