साहित्य : २-३ कांदे , ५ -६ लसूण पाकळ्या , १/२ वाटी खोबऱ्याचा किस , १/२ वाटी शेंगदाण्याचा कूट , १ इंच आलं , कोथिंबीर , तेल ६ चमचे , काळा मसाला २ चमचे ,हिंग , हळद १ चमचा , जिरे १/२ चमचा ,मोहरी १/२ चमचा ,लाल तिखट २ चमचे , दाळीचे पीठ १ वाटी , पाणी
कृती :
रस्सा करण्यासाठी :
प्रथम कढईत १ चमचा तेल घेऊन त्यात कांदा ,लसूण , खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर हे सर्व जिन्नस गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. नंतर हे सर्व १- २ चमचे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घ्यावे.
कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात १/४ चमचा मोहरी, १/४ चमचा जिरे टाकून फोडणी करून घ्यावी. त्यात तयार केलेले वाटण व शेंगदाण्याचा कूट घालून काळा मसाला ,हिंग, १/२ चमचा हळद, १ १/२ चमचा लाल तिखट घालावे. हे वाटण ५- ६ मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर रस्सा करण्यासाठी त्यात गरम पाणी घालावे. (आपणास जेवढा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.) नंतर त्याला उकळी आली की त्यात चवीपुरते मीठ घालावे.
पाटवडी करण्याची पद्धत :
कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात १/४ चमचा मोहरी, १/४ चमचा जिरे टाकून फोडणी करून घ्यावी. त्यात १/२ चमचा तिखट , १/२ चमचा हळद, लसूण व मीठ घालून १ वाटी पाणी टाकावे. पाण्याला उकळी आली की त्यात १ वाटी दाळीचे पीठ घालावे व त्याचे घट्ट पिठले तयार करून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर ते पिठले एका ताटाला तेल लावून एकसारखे थापून घ्यावे व त्याच्या वड्या पाडाव्यात. खाण्याआधी ५ मिनिटे तयार केलेल्या रस्स्यात या वड्या सोडून झाकून ठेवावे.
Comments