आज शंकर महाराजांचा प्रकट दीन
(विशेष लेख !! आवर्जून वाचा व शेअर करा ही नम्र विनंती.)
आज कार्तिक शुद्ध अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी ! आज स्वामींचे परमशिष्य व साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणूनच ओळखले जाणाऱ्या धनकवडीच्या सदगुरू श्री शंकर महाराजांचा आज प्रगटदिन !! त्यानिमित्त सद्गुरू श्री शंकरबाबा महाराजांच्या सुकोमल चरणीं सादर साष्टांग दंडवत !! आज या श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त विशेष लेख शेअर करत आहोत. त्याचा अवश्य लाभ घ्यावा. [लेख सर्वांनी आवर्जून वाचावा व शेअर करावा]
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर ।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर ॥
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है ।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है ॥
हे शब्द आहेत सद्गुरू श्री शंकर महाराजांचे. नाशिक जिल्ह्यामध्ये तालुका सटाणा तालुक्यात अंतापूर हे छोटे गाव वसले आहे. या गावात श्री. नारायण (चिमणाजी) अंतापूरकर व त्यांची पत्नी असे पुण्यशील दांपत्य राहत असे. दोघेही भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते. त्यांना मुलबाळ नव्हते. तरीही ते श्रद्धेने शिवशंकराची भक्ती तसेच उपासना करत. एकदा चिमणाजींना स्वप्नात दृष्टांत झाला, "रानात जा, तुला बाळ मिळेल, ते घेऊन ये!". या दृष्टांताप्रमाणे इ.स. १७८५ - १८०० च्या सुमारास एका कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे अंतापूर नजीकच्या रानात चिमणाजी व त्यांच्या पत्नीस हे बाळ सापडले. शिवभक्त असल्याने तसेच हे बाळ शंकराचाच प्रसाद म्हणून लाभल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले. त्यांच्याकडे काही वर्षे राहून पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतारकार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्याबाबा म्हणून मानू लागले, तर खान्देशात कुँवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत.
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ ऊर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉ. धनेश्वर, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद केशव अत्रे, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. श्री शंकर महाराजांची शिकवण साधीसरळ होती. श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. दासबोध, ज्ञानेश्वरी या ग्रंथावर त्यांचे विशेष प्रेम होते. आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे. ते म्हणत, ‘अरे! आचरण महत्त्वाचे! ग्रंथांचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा!’
श्री शंकर महाराजांना स्वामींचे नामस्मरण, भजन त्यांना अतीव प्रिय होते. ते म्हणत, ‘भावनेने भिजलेले असेल, ते भजन!’ खरोखरच स्वामींच्या नामाचा उच्चार होताच ते अक्षरशः सद्गतीत होत. डोळ्यातून अश्रू वाहत. असेच भावनेने आणि आर्ततेने भिजलेले भजन श्री शंकर महाराजांना अभिप्रेत असावे व तेच स्वामींना खऱ्या अर्थाने प्रिय असेल.
‘माता-पित्याची सेवा करा!’ तसेच “परमार्थात अहंकार टाकणे महत्त्वाचे!" अशी शिकवण ते अनेकांना देत.
महाराजांच्या शब्दांत सांगायचे तर -
माझी जात, धर्म, पंथ कोणता? हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्क-वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ!
अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले. परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये, असेही स्पष्ट केले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २६ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी कार्तिक शुद्ध अष्टमीला (दुर्गाष्टमी) श्री शंकर महाराजांचा प्रगटदिन उत्सव तर वैशाख शुद्ध अष्टमीला (दुर्गाष्टमी) समाधी उत्सव साजरा होतो. श्री शंकर महाराजांच्या भक्तांमध्ये दुर्गाष्टमीला (प्रत्येक महिन्यातील शुद्ध अष्टमीला) विशेष महत्त्व आहे.
शंकर महाराज आजही भक्तांना दृष्टांत देतात व हाकेस धावतात. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज भक्तांसाठी धावून येतात हे खास वैशिष्ट्य आहे.
अशा या सदगुरू श्री शंकर महाराजांचा आज प्रगटदिन आहे. त्यानिमित्त श्री शंकर बाबांच्या सुकोमल चरणीं सादर साष्टांग प्रणिपात !!
शंकर शंकर नाम शुभंकर ।
गुरुवर साक्षात दत्त दिगंबर ॥
शंकर बाबा अवलिया ।
अवतरले जग ताराया ॥
Comments