top of page
श्री विनोद पंचभाई

वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले.


Courtesy -facebook page of VarKari Sampraday

वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.


हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास 'भागवत धर्म' असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास 'दक्षिण द्वारका' असे संबोधण्यात येते.


वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे 'विठ्ठल'चे (विठूचे) उद्‍भ्रष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे.


वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे.


पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच.


गीता,भागवतपुराण,ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत,भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि तुकारामांची अभंगगाथा, हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात.


वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड (प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय)असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षेची पद्धत अशी : ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फडप्रमुखाकडे जावयाचे. तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो. हे नियम असे आहेत : १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच 'रामकृष्णहरी' ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल' ह्या गजरात गळ्यात घालतो.


दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही.


वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गो पी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत.


प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर,आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत.


13 views0 comments

Recent Posts

See All

ध्यान (Meditation)

🙏 ध्यान म्हणजे काय? 🙏 ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत...

Comments


bottom of page